ISSN (Print) - 0012-9976 | ISSN (Online) - 2349-8846

उत्तर प्रदेशातील विरोधकांची व्यूहरचना

आपण वेगळे आहोत हे दाखवण्यासाठी काँग्रेसने घेतलेले पवित्रे व केलेली प्रतिपादनं राजकीय कार्यक्रमांविषयीच्या गोंधळलेपणाचे निदर्शक आहेत.

 

The translations of EPW Editorials have been made possible by a generous grant from the H T Parekh Foundation, Mumbai. The translations of English-language Editorials into other languages spoken in India is an attempt to engage with a wider, more diverse audience. In case of any discrepancy in the translation, the English-language original will prevail.

 

उत्तर प्रदेशात अलीकडे घडलेल्या राजकीय घडामोडी केंद्रातील सत्ताधारी आघाडीच्या विरोधातील शक्तींना बळकटी आणण्याची शक्यता आहे. बहुजन समाज पक्ष (बसप) व समाजवादी पक्ष (सप) यांच्यातील युती कणखर स्वरूपाची सामाजिक आघाडी म्हणून पुढे आली आहे, आणि उत्तर प्रदेशातील भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) निवडणुकीतील कामगिरीला या आघाडीमुळे मोठी हानी पोहोचू शकते. शिवाय, प्रियांका गांधी-वड्रा यांना काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्त करण्यात आलं आहे आणि उत्तर प्रदेशाच्या पूर्व भागातील प्रचाराची सूत्रं त्यांच्या हाती देण्यात आली आहेत; या निर्णयामुळे त्यांच्या पक्षाचं २०१९च्या लोकसभा निवडणुकांमधील भवितव्य उजळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे. उत्तर प्रदेश राज्य भाजपसाठी महत्त्वाचं आहे, कारण आत्तापर्यंत जेव्हा-जेव्हा केंद्रात भाजपने सत्ता मिळवली तेव्हा त्यांच्या सुमारे एक चतुर्थांश ते एक पंचमांश जागा उत्तर प्रदेशातून आलेल्या होत्या. त्यामुळे, उत्तर प्रदेशात निवडणुकीचा निकाल पालटण्याची शक्यता आहे आणि आगामी सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पराभवाचा धोका भाजपला भेडसावू लागला आहे.

उत्तर प्रदेशात भाजपचा पाडाव करण्यासाठी कोणताही प्रयत्न होत असेल तर त्याला मोठा आधार बसप व सप यांच्या संयुक्त शक्तीद्वारे मिळतो, हे उघड आहे. या दोनह पक्षांचा सामाजिक पाया घट्ट आहे, त्यामुळे त्यांच्याद्वारे भाजपसमोर मोठी आव्हानं उभी राहातात. त्यांच्याशी संबंधित सामाजिक गटांमध्ये काही अंतर्विरोध आहेत, त्यामुळे या दोन पक्षांमध्ये दीर्घ काळ वैरभाव रुजला होता. पण आता बसप व सप यांनी या वैरभावावर मात केली आहे. आदित्यनाथ यांच्या सत्ताकाळात हिंदुत्ववादी उच्च जातीय आक्रमकता/प्रतिपादकता वाढत गेल्यामुळे बसप व सप यांच्यातील अंतर्विरोध मूक झाले आहेत किंवा दुय्यम ठरले आहेत. त्यामुळे या दोन पक्षांची युती केवळ स्वतःच्या राजकीय टिकावासाठी झालेली नाही, तर त्यांना आपापाल्या सामाजिक आधारगटांमधूनच आघाडीसाठीचा दबाव जाणवू लागला होता, त्यामुळे २५ वर्षांमध्ये पहिल्यांदाच त्यांनी हातमिळवणी केली आहे. इतर विरोधी पक्ष सहायक भूमिकेतून त्यांच्या सोबत आल्यावर या आघाडीची समीकरणं अधिक बळकट होतील. विद्यमान सरकारबाबत नाराज झालेल्या मतदारांना दुसरा धृव म्हणून या आघाडीचा पर्याय स्वीकारता येईल. राष्ट्रीय लोक दल किंवा निशाद (निर्बल इंडियन शोषित हमारा आम दल) यांसारखे लहान पक्षा आघाडीमध्ये सामावले जाण्याच्या तयारीत आहेत, परंतु काँग्रेसचा यात सहभाग नाही. केवळ काही मोजक्या जागा लढायला मिळतील, अशा पद्धतीची सहायक भूमिका स्वीकारण्यास काँग्रेस इच्छुक नाही, त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. अखिल भारतीय पक्ष, या आपल्या स्थानापासून खाली येण्याची काँग्रेसची तयारी नसावी. प्रियांका गांधी वड्रा यांना पक्षाच्या कामकाजात सहभागी करून पक्षाचं हे स्थान अधोरेखित करण्याचा व उत्तर प्रदेशातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.

या निर्णयानंतर तत्काळ मोठा गाजावाजा झाला असला, तरी उत्तर प्रदेशातील काँग्रेसचं सध्याचं सामर्थ्य व संघटनाबांधणी यांचा विचार करता, उत्तर प्रदेशात काँग्रेस हा तिसरा धृव किंवा प्रमुख आव्हानकर्ता बनेल का, याविषयी शंका आहे. अशा प्रकारे तिसरा धृव निर्माण झाल्यास उच्चजातीय मतपेढीतील (जे बसप-सप आघाडीला बहुधा मतदान करणार नाहीत अशा गटांमधील) मोठा वाटा त्याच्याकडे जाईल आणि भाजपला आणखी फटका बसेल, असं मानणारा एक वर्ग आहे. अशा विश्लेषणामध्ये उच्चजातीयांच्या राजकीय धूर्तपणाकडे पुरेसं लक्ष दिलं जात नाही. विशेषतः कनिष्ठ जातीयांकडून कणखर आव्हान उभं राहिलं असेल, तेव्हा हा धूर्तपणा अधिक जागरूकतेने कार्यरत होतो. शिवाय, विरोधी मतांमधील अगदी लहान फटींनीही उत्पन्न होणाऱ्या जोखमींचा विचार या विश्लेषणात केला गेलेला नाही. स्वतःचं वेगळं स्थान प्रतिपादित करून मतविभागणीचा धोका स्वीकारण्याची काँग्रेसची तयारी आहे, यावरून राजकीय अग्रक्रमांविषयी त्यांचं आकलन किती गोंधळलेलं आहे, हे दिसून येतं.

सार्वत्रिक निवडणुकांच्या संदर्भात सर्वांत मोठी विरोधी शक्ती म्हणून काँग्रेसला स्वतःसमोर तीन संभाव्य उद्दिष्ट ठेवता येतील. एक, लोकांच्या जीवनाला व उपजीविकेलाच नव्हे तर या देशाच्या सामाजिक विणीलाही धोका निर्माण करणाऱ्या विद्यमान सरकारला खाली खेचणं; दोन, स्वतःची संघटनात्मक पुनर्बांधणी करणं व स्वतंत्र सामर्थ्य वाढवणं; तीन, निवडणुकांनंतर काँग्रेसचा पंतप्रधान सत्तेवर आणणं. सर्वसाधारणतः ही तीन उद्दिष्ट परस्परांहून तुटलेली नसतात, पण काँग्रेस पक्षाची सद्यस्थिती व राजकीय शक्तींच्या सहसंबंधांमधील भिन्नता लक्षात घेता या उद्दिष्टांमध्ये निवड करण्याची वा अग्रक्रम ठरवण्याची वेळ पक्षावर येऊ शकते. यातील पहिलं उद्दिष्टच प्राधान्याने साध्य करायला हवं, असं स्वाभाविकपणे वाटू शकतं. हे उद्दिष्ट साध्य करायचं तर भाजपेतर मतं स्वतःकडे खेचावी लागतील. विरोधी पक्षांच्या अनुभवी नेत्यांनी नमूद केल्याप्रमाणे, त्या-त्या राज्यातील सर्वाधिक सक्षम विरोधी शक्तीच्या सोबत जाऊन हे साध्य करता येईल. हे घडण्यासाठी तार्किकदृष्ट्या उपरोल्लेखित दुसरं उद्दिष्ट बाजूला ठेवावं लागेल (काँग्रेस ही सर्वांत सक्षम विरोधी शक्ती असलेल्या राज्यांमध्ये इतर पक्षांनाही हे लागू होतं) आणि व्यक्तिगत आकांक्षांवर मर्यादा घालावी लागेल. हे करण्याची काँग्रेसची इच्छा नाही, म्हणून त्यांनी उत्तर प्रदेशात स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतलेला दिसतो. यामुळे तिथली निवडणुकीय स्पर्धा तीन धृवांमधील होणार आहे. आपण ‘आक्रमकतेने खेळतो आहोत’, असा दावा काँग्रेस करत असला, तरी प्रत्यक्षात एकाच वेळी भिन्न उद्दिष्ट साध्य करण्याची त्यांची खटपट सुरू असल्याचं दिसतं.

बसप-सप आघाडीमागील तर्क केवळ निखळ व्यावहारिकतेपुरता मर्यादित नाही, तर खोलवरच्या सामाजिक शक्तींमधून तो निपजलेला आहे, त्याचप्रमाणे राज्यागणिक आघाड्या करण्याचा मुद्दा केवळ व्यूहात्मक नाही. या देशाच्या विभिन्न आणि विषम सामाजिक-राजकीय वास्तवामध्ये याची मुळं रुजलेली आहेत. भाजप व संघ परिवार यांचा राजकीय प्रकल्प एकप्रवाही व अधिसत्तावादी आहे, त्यामुळे या विविधतेला ते सातत्याने दडपू पाहतात. शेवटी हेच त्यांच्या नाशालाही कारणीभूत ठरू शकतं. या राजकीय प्रकल्पाला एखादा विश्वसनीय पर्याय उभा करायचा असेल, तर त्याच्या संघटनात्मक रूपामध्ये व राजकीय कार्यक्रमाच्या आशयामध्ये या विभिन्न व विषम वास्तवाची अभिव्यक्ती दिसावी लागेल. परंतु, हे वास्तव मान्य करण्याची काँग्रेसची इच्छा दिसत नाही. भारतातील सामाजिक वास्तवाचं एकमेव अस्सल प्रतिबिंब आपल्याच पक्षामध्ये पडलेलं आहे, असा त्यांचा ठाम समज आहे. त्यामुळे उपरोल्लेखित पर्याय प्रत्यक्षात आणण्यासाठीचा एक उत्प्रेरक घटक ही भूमिका निभावणं काँग्रेसला जमत नाही. सर्वांत मोठा भाजपेतर पक्ष म्हणून काँग्रेसकडे अशा पर्यायी शक्तीचं नेतृत्व येऊ शकतं. परंतु, व्यक्तिगत उद्दिष्टं बाजूला ठेवून इतर राजकीय शक्तींच्या दाव्यांचीही दखल घेतली तरच ही नेतृत्वाची भूमिका काँग्रेसला निभावता येईल. उत्तर प्रदेश या भारतातील सर्वांत मोठ्या राज्यामध्ये काँग्रेसने टाकलेली पावलं पाहता या संदर्भात त्यांना अजून बरंच काही शिकावं लागेल, असं दिसतं.

Back to Top