ISSN (Print) - 0012-9976 | ISSN (Online) - 2349-8846

ट्रम्प ‘दगाबाज देशद्रोही’ आहेत का?

ट्रम्प यांच्यावर होणाऱ्या देशद्रोहाच्या आरोपामागील खऱ्या कारणांचं विश्लेषण व्हायला हवं.

The translations of EPW Editorials have been made possible by a generous grant from the H T Parekh Foundation, Mumbai. The translations of English-language Editorials into other languages spoken in India is an attempt to engage with a wider, more diverse audience. In case of any discrepancy in the translation, the English-language original will prevail.

 

हे अनपेक्षित होतं, असं म्हणता येणार नाही. किंबहुना योग्य वेळ बघून हे घडल्याचं दिसतं. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात होणाऱ्या हेलसिंकी शिखरबैठकीच्या तीन दिवस आधी- १३ जुलै रोजी अमेरिकेचे उप-अटर्नी जनरल रॉड रोझेनस्टाईन यांनी काही खळबळजनक आरोप केले. बारा रशियन गुप्तचर अधिकाऱ्यांनी कथितरित्या डेमॉक्रेटिक नॅशनल कमिटीचे संगणकीय सर्व्हर व हिलरी क्लिंटन यांचे प्रचारप्रमुख जॉन पोदेस्ता यांचे ई-मेल खाते हॅक केले आणि यातून मिळालेल्या ई-मेलचा मजकूर विकिलिक्सकडे दिला, त्यानंतर विकिलिक्सनं तो आपल्या संकेतस्थळावर प्रकाशित केला, असा आरोप रोझेनस्टाईन यांनी केला. या घडामोडींमुळं रशियानं ‘अमेरिकी लोकशाहीला बाधा पोचवली आहे’, असा दावा डेमॉक्रेटिक पक्षाचे नेते, अमेरिकेतील बडी प्रसारमाध्यमं व अमेरिकी गुप्तचर संस्थांनी केला.

अमेरिकेतील २०१६ सालच्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीमध्ये रशियानं हस्तक्षेप केल्याचा आरोप आक्रमक जोरकसपणे मांडला गेला आहे, पण त्याला तितक्या जोरकस पुराव्याची जोड मिळालेली नाही. पण ट्रम्प यांच्यावर शिक्का मारण्याचं अभियान डेमॉक्रेटिक नेते, बडी माध्मं व गुप्तचर संस्थांनी आधीपासूनच सुरू केलं होतं. शिवाय, विकिलिक्सविरोधातील आरोपांमुळे आता आपल्याला विकिलिक्सचे संस्थापक ज्युलिआन असांजे यांच्याविरोधातील अभियानाचं आणखी समर्थन करता येईल, अशी आशा डेमॉक्रेटिक मंडळींना व गुप्तचर संस्थांना वाटू लागली होती. दरम्यान, सेंट्रल इन्टेलिजन्स एजन्सीक़डून (सीआयए) होणारा छळ आणि अमेरिकी नागरिकांवर नॅशनल सिक्युरिटी एजन्सीकडून पाळत ठेवली जात असल्याचे प्रकार एडवर्ड स्नोडेननं प्रकाशात आणले, त्यामुळं गुप्तचर संस्थांना स्वतःचाच बचाव करण्याची वेळ आली. जागलेपणाची कृती करणारा व खऱ्या अर्थानं लोकशाहीवादी असलेला स्नोडेन याला अमेरिकी गुप्तरच संस्था देशद्रोही मानतात, तर रशियानं २०२० सालापर्यंत त्याला आश्रय दिला आहे, हे इथं नोंदवणं अप्रस्तुत ठरणार नाही.

ट्रम्प व पुतीन यांच्यात हेलसिंकी इथं झालेल्या बैठकीतील प्रत्यक्ष तपशिलाविषयी फारसं वार्तांकन झालेलं नाही, ही बाब गूढ वाढवणारी ठरली आहे. आत्तापर्यंतच्या ‘एखाद्या अमेरिकी राष्ट्राध्यक्षाचं सर्वांत लज्जास्पद वर्तन’ इथं पाहायला मिळत असल्याचं बैठकस्थळी उपस्थित राहिलेल्या ‘सीएनएन’च्या निवेदकानं प्रेक्षकांना सांगितलं. अमेरिकेतील २०१६ सालच्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकांमध्ये रशियानं हस्तक्षेप केल्याच्या मुद्द्यावर ट्रम्प यांनी अमेरिकी गुप्तचर संस्थांपेक्षा पुतीन यांच्या म्हणण्याला महत्त्व दिलं, ही वस्तुस्थिती अमेरिकी प्रस्थापित व्यवस्थेला पचवता आलेली नाही, हे यातून स्पष्ट झालं. बैठकीनंतरच्या संयुक्त पत्रकारपरिषदेत पुतीन यांनी रशियावरील प्रस्तुत आरोप थेटच फेटाळून लावले. आपण स्वतः एक माजी गुप्तचर अधिकारी असल्यामुळं अशा प्रकारचे दस्तावेज कसे तयार केले जातात याची कल्पना आपल्याला आहे, असंही त्यांनी सांगितलं (पुतीन हे रशियन गुप्तचर संस्था ‘केजीबी’मध्ये अधिकारी राहिलेले आहेत).

माजी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळात ‘सीआयए’चे संचालक झालेले जॉन ब्रेनन यांच्या म्हणण्यानुसार, ट्रम्प यांची हेलसिंकीमधील कृत्यं ‘उच्च गुन्हा व गैरवर्तन’ यांच्या सीमारेषांवरची होती. ‘न्यूयॉर्क टाइम्स’मधील स्तंभकार थॉमस फ्रीडमन यांनीही या म्हणण्याला पुष्टी दिली: ट्रम्प हे ‘रशियन गुप्तचर संस्थांसाठी मूल्यवान आहेत’, अशी टिप्पणी त्यांनी केली. “माझ्या अमेरिकी साथींनो, तुम्ही ट्रम्प व पुतीन यांच्यासोबत आहात की सीआयए, एफबीआय (फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन), व एनएसए यांच्यासोबत आहात?” असा प्रश्नही त्यांनी विचारला.

पण मुळात उदारमतवाद्यांनी- अगदी उजव्या राजकीय अवकाशातील उदारमतवाद्यांनी गुप्तचर संस्थांची बाजू घ्यावी का, असा प्रश्न विचारण्याची गरज आहे. अशा प्रकरणांमध्ये समर्थन देण्यासाठी निवडीचे पर्याय ट्रम्प किंवा अमेरिकी राज्यसंस्थेतील ‘खोलवरची राज्यसंस्था’ असलेल्या गुप्तचर संस्था एवढ्यांपुरतेच मर्यादित असावेत का? इराकच्या विध्वंसासाठी कारण मिळावं म्हणून तिथं ‘जनसंहारक अस्त्रं’ असल्याचा बनावट पुरावा सादर करणाऱ्या गुप्तचर संस्थांची बाजू कोणती आहे? स्नोडेनच्या खुलाशांनी स्पष्ट केल्यानुसार, याच संस्था अमेरिकी नागरिकांवर सामूहिक पाळत ठेवतात. राजकीय विरोधकांचा छळ वा हत्या करण्याचे आदेश देणाऱ्या या संस्था आहेत. अफगाणिस्तान, पाकिस्तान, लिबिया, सोमालिया व येमेनमध्ये अशा विरोधकांना संपवण्यासाठी ड्रोन क्षेपणास्त्रं पाठवायला या संस्थांनी कमी केलं नाही. मग अशा कारवाईत शेकडो निःशस्त्र नागरिक ‘कोलॅटरल डॅमेज’ म्हणून मृत्युमुखी पडले, याचीही फिकीर त्यांना नव्हती.

अमेरिकेतील २०१६च्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकांमध्ये रशियानं हस्तक्षेप केल्याच्या मुद्द्यावर अमेरिकी गुप्तचर संस्थांपेक्षा पुतीन यांचं म्हणणं मान्य केल्याबद्दल ट्रम्प यांचा उन्मादी धिक्कार सुरू आहे. रशियाबाबत अमेरिकेचं परराष्ट्र धोरण कसं असावं, यांविषयी अमेरिकी सत्ताधारी वर्ग आणि राजकीय प्रस्थापित व्यवस्था यांच्यात काही मूलभूत मतभेद आहेत, त्यामुळं ट्रम्प यांच्यावर ही टीका होते आहे. रशियाविरोधात अधिक आक्रमक परराष्ट्र धोरण असावं, अशी ट्रम्प यांच्या इथल्या विरोधकांची मागणी आहे. सोव्हिएत संघाच्या पाडावानंतर पश्चिम आशिया, आणि पूर्व युरोप व मध्य आशिया या प्रदेशांमध्ये भूराजकीय सत्तापोकळी निर्माण झाली. या परिस्थितीचा लाभ घेऊन या भागांमध्ये आपण प्रवर्तकाच्या भूमिकेत जाण्याचा अमेरिकेचा प्रयत्न सुरू आहे. या प्रक्रियेद्वारे रशियाला आणखी दुर्बल करावं, अशी ही योजना आहे. आपलं लक्ष्य साध्य करण्यासाठी अमेरिकेनं उजवे गट, कट्टरतावादी आणि दहशतवादी शक्तींना सर्वतोपरी वापरलेलं आहे. इराक, सिरिया, इजिप्त व लिबियामध्ये प्रतिगामी राजकीय इस्लामचा वापर अमेरिकेनं केला, तर युक्रेनमध्ये स्थानिक ‘फॅसिस्टां’चा वापर करण्यात आला. आता रशिया, चीन व इराण यांची युरेशियन संरक्षक आघाडी उभी राहिल्यावर पुढील मार्गक्रमणा कशी करावी, याबद्दल अमेरिकी सत्ताधारी व्यवस्थेमध्ये सखोल असहमती निर्माण झाली आहे. रशियासोबतचा तणाव तात्पुरता निवळू द्यावा, ही ट्रम्प यांची व्यूहरचना या प्रस्थापितांपैकी बहुतेकांना मान्य नाही.

सत्ताधारी व्यवस्थेतील या मतभेदांना जाणीवपूर्वक अस्पष्ट ठेवण्यात आलं आहे, आणि पुतीन यांना अमेरिकी राष्ट्रहित विकून टाकल्याच्या कारणावरून ट्रम्प यांना देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Back to Top