बिटकॉइन-ब्लॉकचेनचा बुडबुडा
संपत्ती किंमतीला आलेला ताजा फुगवटा हे खाजगी मालमत्तेबद्दल भांडवलशाहीला असलेल्या अविवेकी हव्यासाचं एक लक्षण आहे.
The translations of EPW Editorials have been made possible by a generous grant from the H T Parekh Foundation, Mumbai. The translations of English-language Editorials into other languages spoken in India is an attempt to engage with a wider, more diverse audience. In case of any discrepancy in the translation, the English-language original will prevail.
शिकागो बोर्ड ऑप्शन्स एक्सेंजमध्ये १० डिसेंबर २०१७ रोजी बिटकॉइन या आभासी चलनाद्वारे भविष्यकालीन व्यापार (फ्युचर्स ट्रेडिंग) करण्याची सुरुवात झाली. त्यानंतरच्या आठवड्यात अधिक मोठ्या शिकागो मर्कन्टाइल एक्सेंजमध्येही या चलनाचा वापर झाला. अनियामक विनिमयाद्वारे व्यापार करण्यावर आपल्या नियमांनी निर्बंध सहन कराव्या लागणाऱ्या बड्या संस्थात्मक गुंतवणूकदारांना आता आणखी एक नवीन वित्तीय साधन हाताशी मिळालं आहे. बिटकॉइनच्या किंमती वाढत चालल्या असताना बडे संस्थात्मक गुंतवणूकदार यातून प्रचंड भांडवली लाभ उठवण्याची संधी साधण्यापासून फार काळ मागं राहिले नसतेच. किंमतीमध्ये प्रचंड अस्थिरता असली तरीही एका वेळी- डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात- बिटकॉइननं २० हजार डॉलरांपर्यंत मजल मारली होती जानेवारी २०१७मध्ये हा आकडा एक हजार डॉलर होता. या पार्श्वभूमीवर हा सट्टेबाजीचा बुडबुडा कधी फुटेल या विषयी चिंता व्यक्त होत होत्या. बिटकॉइनचं हे सट्टेबाजीतलं वेड अतिशय जोखमीचं आहे, अशी टीका केंद्रीय बँकांनी आणि वित्तीय अधिकारीसंस्थांनी केलेली असूनही बिटकॉइन व इतर आभासी चलनांमध्ये विशेषतः गुंतलेल्या बचाव निधींना चांगले दिवस आल्याचं दिसतं आहे.
खरं तर, वित्तीय महासंकटानंतर फेडरल रिझर्व, यूरोपीय केंद्रीय बँक आणि बँक ऑफ जपान यांसारख्या केंद्रीय बँकांनी स्वीकारलेल्या ‘संख्यात्मक सहजते’च्या आर्थिक धोरणामुळंच ही अभूतपूर्व रोकडसुलभता निर्माण झाली आहे. यामुळं संपत्ती बाजारपेठांमध्ये (रोखे, बंधपत्र, इतर वित्तीय संपत्ती, स्थावर मालमत्ता, इत्यादी) सट्टाधारीत गुंतवणूक झाली, त्यातून संपत्ती मूल्यांमध्ये प्रचंड चलनवाढ झाली. अशा प्रकारे संपत्ती किंमतींमध्ये झालेली चलनवाढ, शिवाय याच संपत्तीबाबतची सट्टेबाजी, यांमुळं संपत्ती खरेदीसाठीच्या वित्तपुरवठ्याकरीता उसनवारी करण्यातही वाढ झाली. संपत्ती मूल्यांमधील चलनवाढीला यातून प्रोत्साहनच मिळालं आणि सट्टेबाजीचा वारूही अधिक वेगानं उधळला. सट्टेबाजांचं पतमूल्य त्यांच्याकडील संपत्तीच्या बाजारपेठीय मूल्यावर ठरत असतं आणि कर्जपुरवठा करणाऱ्या बँकेसाठी तारण म्हणूनही त्याचा उपयोग होतो.
संख्यात्मक सहजतेतून रोकडसुलभता आली, आणि विकसित भांडवली अर्थव्यवस्थांच्या ‘वास्तव’ भागांमधील कुंठितावस्थेमुळं भांडवली लाभाचे शेवटचे वाटे काबीज करण्यासाठीची स्पर्धा साहजिकपणेच सुरू झाली. त्यामुळं वित्त बाजारपेठांच्या पुरवठा आघाडीवर लगोलग आभासी चलनाचा ‘वित्तीय नवशोध’ उगवला. बिटकॉइन हे २००९ साली सुरू झालेलं अशा प्रकारचं पहिलं डिजीटल चलन होतं. आपल्या व्यवहारांच्या सुरक्षिततेसाठी, अतिरिक्त केंद्रांच्या निर्मितीसाठी व हस्तांतरणाच्या तपासणीसाठी हे चलन क्रिप्टोग्राफीचा वापर करतं. बिटकॉइनचं अंतःस्थ विकेंद्रित खातेवही तंत्रज्ञान- ब्लॉकचेन- वापरणाऱ्या उद्योगांचे समभाग रोखे बाजारात अपेक्षेप्रमाणे वेगानं वधारत आहेत. बिटकॉइन आणि इतर आभासी चलनांच्या अतिरिक्त केंद्रांच्या निर्मितीसाठी स्थापन झालेल्या उद्योगांचे (आभासी चलन ‘खाणकाम’, असं या प्रक्रियेला संबोधलं जातं) समभागही उच्चांक गाठत आहे.
इंटरनेटशी संबंधित उद्योग करत असल्याचा दावा करणाऱ्या कंपन्यांचे समभाग १९९९ साली गगनाला भिडले होते, त्याला ‘डॉट-कॉम बुडबुडा’ असं संबोधलं गेलं होतं. त्याची आठवण बिटकॉइनच्या संदर्भातही होते. अविवेकी उत्साहानं पुन्हा एकदा वर्चस्व गाजवायला सुरुवात केली आहे. काही प्रमाणात अतिशयोक्ती करून असं म्हणता येईल की, तुम्हाला कंपनीच्या समभागाचं मूल्य वेगानं वाढवायचं असेल, तर केवळ तिचं नाव बदला- ‘लाँग आयलंड आइस्ड टी कॉर्प’नं स्वतःचं नाव ‘लाँग ब्लॉकचेन कॉर्प’ केलं, तसं करा! तसंही, हे वित्तीय उत्पादन आणि प्रक्रियात्मक नवशोधन म्हणजे इंटरनेट क्रांतीचा दुसरा टप्पा असल्याचा गाजावाजा बिटकॉइन व ब्लॉकचेन प्रवक्ते करत आहेतच की! डॉलर, यूरो किंवा रुपया यंसारख्या चलनांबाबत केंद्रीय अधिकारीसंस्थेवर (केंद्रीय बँकेवर) आणि व्यावसायिक बँकिंग व्यवस्थेतील वित्तीय मध्यस्थावर किंवा आपापल्या केंद्रीय बँकांना पाठिंबा देणाऱ्या राज्यसंस्थेच्या व्यवस्थेवर भरवसा ठेवावा लागतो, परंतु बिटकॉइनच्या बाबतीत अशी परिस्थती नसल्याचा दावा या समर्थकांकडून केला जातो आहे. जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये इंटरनेटच्या माध्यमातून जागतिक वित्तपुरवठ्याच्या युगात प्रवेश करता येईल आणि या बाजारपेठेला कोणत्याही केंद्रीय बँकेच्या किंवा वित्तीय अधिकारीसंस्थेच्या नियमांचं वा नियमनांचं बंधन सहन करावं लागणार नाही, अशी ही मांडणी आहे!
हा गाजावाजा बाजूला ठेवून बिटकॉइन-ब्लॉकचेन बुडबुड्याच्या येऊ घातलेल्या स्फोटाचा प्रश्न विचारात घ्यावा लागतो. २००७साली बीअर स्टर्न्स कंपनीच्या दोन बचाव निधींना अपयश आलं होतं आणि त्यानंतर अतिशय जोखमीचं तारण ठेवणाऱ्या कर्ज उत्तरादायीत्व बाजारपेठेला गोठवण्यात आलं होतं. त्या वर्षी, थोडं आधी, जून महिन्यात फेडरल रिझर्वचे तत्कालीन अध्यक्ष बेन बर्नान्की यांनी असा दावा केला होता की, गहाण कर्जांवर आधारीत बाजारपेठांचा तारणसंबंधित कारणांवरून स्फोट झाल्यास त्याचा एकूण वित्तीय व्यवस्थेवर कोणताही मोठा विपरित परिणाम होणार नाही. या तारणांविषयीची सट्टेबाजी आणि व्यापक वित्तव्यवस्था यांच्यातील सूक्ष्म परस्परसंबंधांमुळं वित्तीय महासंकट निर्माण होऊ शकतं, हे बर्नान्की यांना माहीत नव्हतं का?
बिटकॉइन-ब्लॉकचेन यांचं उधळलेलं वारू आणि इतर संपत्ती बाजारपेठा, बँक कर्जपुरवठा, पत बाकी अदलाबदल यांच्यातील सूक्ष्म संबंध काय आहेत? खरं तर, आपल्याला याची कोणतीही कल्पना नाही. परंतु, संपत्ती किंमतीचा मोठा बुडबुडा फुटतो आणि त्यातील अंतःस्थ तारण नष्ट होतं, तेव्हा वित्तसंस्था व बाजारपेठांवर आणि सर्व देशांमध्ये अरिष्ट कोसळू शकतं, हे मात्र आपल्याला माहीत आहे.
परंतु यातील मुख्य मुद्दा हा आहे की, विकसित भांडवली देशांमधील दीर्घकालीन आर्थिक कुंठितावस्था कायम असल्यामुळं उत्पादकीय गुंतवणूक नव्हे, तर सट्टेबाजीचा वित्तपुरवठा आर्थिक वृद्धीचा मुख्य कारक घटक बनला आहे. निराळ्या शब्दांत सांगायचं तर, ही आर्थिक व्यवस्था चालू ठेवण्यासाठी वित्तीय बुडबुड्यांची अशी मालिका गरजेची ठरते. अशा प्रकारच्या वित्तपुरवठ्यातून निर्माण झालेल्या सांपत्तिक परिणामामुळं (उत्पन्न वाढलं नाही तरी संपत्तीच्या किंमतींमधील वाढीमुळं उपभोगात वाढ होण्यासाठीची वृत्ती) वास्तविक अर्थव्यवस्थेला उत्तेजना मिळते. परंतु हा वित्तीय बुडबुडा फुटतो, तेव्हा वास्तविक अर्थव्यवस्था कोसळते. आधीच्या वित्तीय वारूंप्रमाणे बिटकॉइन-ब्लॉकचेन यांविषयीच्या अवाजवी आकर्षणातूनही भांडवलशाहीचा कोणत्याही मार्गानं संपत्ती जमवायला हव्यास दिसून येतो. मग या युक्त्यांमधून व्यापक लोकसमूहाच्या खऱ्या गरजा भागवल्या जातात किंवा नाही, याच्याशी या व्यवस्थेला काहीही देणंघेणं राहात नाही.